संगमनेर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाइन पद्धतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
धसकटे म्हणाले, व्यवसायानिमित्त मराठी बोलणारा भाषिक कोठे ना कोठे आढळतो. संत साहित्याचा विचार केल्यास संतांनी आपल्या सगळ्या रचना मराठीमध्ये केल्या आहेत. आधुनिक काळात कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेविषयी खूप मोठे कार्य केलेले आहे. ते आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी व्यक्त केले.
गायकवाड म्हणाले, मराठी भाषा श्वास, शब्द, विचार, कृतीतून प्रत्यक्षात उतरली पाहिजे. भाषा ही आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत असते. मराठी प्रादेशिक भाषा असली तरीही खूप आशयसंपन्न भाषा आहे. मराठी भाषेतून व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज निर्माण आहे. भावी काळात अनेक व्यवसाय मराठी भाषेच्या रूपाने आपणास करता येतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभागप्रमुख डॉ. अशोक लिंबेकर यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व, भाषेतील रोजगाराच्या विविध संधीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परकीय भाषेत शिक्षण घेतल्यामुळे स्व-भाषेविषयी व्यक्तीच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. स्वतःच्या भाषेकडे अनेकजण दुर्लक्ष करतात म्हणून आधी स्वभाषेचा आग्रह धरा. मराठी भाषेविषयी मनात न्यूनगंड न बाळगता अभिमान असला पाहिजे तरच मराठीला सुवर्णकाळ येण्यास वेळ लागणार नाही.
यावेळी मराठी विभागातील प्राध्यापक डाॅ. राहुल हांडे यांनीही मराठी भाषेविषयी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. बालाजी घारुळे यांनी अतिथी परिचय केला. सूत्रसंचालन व आभार डॉ. शरद थोरात यांनी मानले.