शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : शहर आणि तालुका पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये १४०० किलो गोमांस, दोन चारचाकी वाहने असा एकुण ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चारचाकी वाहनांमधून गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारमधून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी (दि.२४) रात्री ८ वाजेच्या सुमारास खराडी रस्ता, नवले वस्ती या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत ८० हजार रुपये किमतीचे ४०० किलो गोमांस आणि दोन लाख रुपये किमतीची कार असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना पाहून कारचालक पळून गेला. पोलिस कॉन्स्टेबल विशाल रामदास कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस नाईक जाधव अधिक तपास करीत आहेत.
शुक्रवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून गोवंश जनावरांचे मांस वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नाशिक-पुणे महामार्गावर कऱ्हे फाटा येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ लाख ५० हजार रुपये किमतीचे गोमांस आणि चार लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुज्जफर जाकीर हुसेन कुरेशी (वय २८, रा. दादामिया इस्लामी चाळ, कुरेशी नगर, कुर्ला (पूर्व) मुंबई), असलान अस्लम कुरेशी (वय २२, रा. अल्ताफ बिल्डिंग रूम नंबर ०६, कब्रस्तान रोड, कुरेशी नगर, कुर्ला (पूर्व) मुंबई) या दोघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई बाबासाहेब केशव शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हेड कॉस्टेबल वायाळ अधिक तपास करीत आहेत.