कोपरगाव : नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचारी यांना काही नगरसेवक तसेच महिला नगरसेवकांच्या पतीराजाकडून अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती. त्याच्या निषेधार्थ अधिकारी, कर्मचारी यांनी बुधवारी सायंकाळपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी (दि. ११) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सामूहिक बैठक घेऊन मध्यस्थी करून नगरसेवकांच्या वतीने भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे व गटनेते रवींद्र पाठक यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनस्थळी बुधवारी एका अधिकाऱ्याला अरेरावीची भाषा वापरणारे नगरसेवक विजय वाजे यांनीच आमची माफी मागावी, तरच आम्ही काम बंद आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता. मात्र, या वेळी नगरसेवक वाजे उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे व गटनेते रवींद्र पाठक यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त करण्याची भूमिका घेतली. तरीही अधिकारी-कर्मचारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर शहराची होणारी गैरसोय लक्षात घेता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पुढाकार घेत यापुढे कोणत्याही नगरसेवकांची अशी दांडगाई खपवून घेतली जाणार नाही. पुन्हा असे गैरप्रकार घडल्यास पोलीस कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दुपारी आंदोलन मागे घेतले. तसे निवेदनही नगराध्यक्ष वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना देण्यात आले.
..........