बोटा : दमदार मोसमी पावसाने अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी लघु प्रकल्प शुक्रवारी दुपारनंतर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. यामुळे या धरणाखालील कोटमारा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
कच नदी ब्राम्हणवाडा परिसरात उगम पावते या पाणलोट क्षेत्रातही मोसमी पावसाचे प्रमाण कमी होते. लांबलेला या मोसमी पावसाने नुकतीच दमदार हजेरी लावल्याने तेथील या नदीवरील बंधारे भरून वाहू लागल्याने पाण्याची आवक बेलापूर बदगी लघु प्रकल्प होऊ लागली.
दरम्यान, अखेर शुक्रवारी दुपारनंतर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. रात्री सांडव्यावरून पाणी भरून वाहू लागले आहे. या पाण्याची आवक कुरकुटवाडी आंबीदुमाला परिसरातील कोटमारा धरणात होऊ लागली आहे. यामुळे हे धरणही भरणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.