कुकाणा : बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी १ डिसेंबर पासून सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी रात्री मागे घेण्यात आले. जून २०१८ पर्यंत या मार्गाचे फेर सर्व्हेक्षण करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.याबाबत नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्य रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा घडवून आणली. त्याची दखल घेऊन (गुरुवारी) उपोषणाच्या सातव्या दिवशी उपोषणार्थींच्या मागण्या मान्य करून जून २०१८ पर्यंत बेलापूर - परळी या रेल्वे मार्गाचे फेरसर्वेक्षण पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले. या आश्वासनाचे पत्र आमदार मुरकुटे यांच्याकडे रेल्वे प्रशासनाने सुपूर्द केले. त्यामुळे गुरूवारी रात्री उशीरा भाजापाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिनकर गर्जे, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, अभिजीत लुनिया यांनी उपोषणार्थी रितेश भंडारी, सुरेश नरवणे, कारभारी गरड, प्रकाश देशमुख, निसार सय्यद, महेश पुंड यांची भेट घेऊन लेखी पत्र आल्याची माहिती देऊन उपोषण सोडण्याविण्याची विनंती केली. त्यामुळे बेरड यांच्या हस्ते शरबत घेऊन रात्री उशिरा हे उपोषण सोडण्यात आले. शुक्रवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते ते लेखी पत्र उपोषणार्थींना सुपूर्त करण्यात आले.
बेलापूर-नेवासा-गेवराई-बीड-परळी रेल्वे मार्गाचे होणार फेरसर्व्हेक्षण; आश्वासनानंतर उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 1:23 PM