श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोगातील व्याजाच्या रकमेतून १३ लाख १५ हजार रुपये किमतीची रुग्णवाहिका जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नांनी मिळाली आहे.
नवीन रुग्णवाहिकेचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ लोकार्पण करण्यात आले. यावेळी शरद नवले, डॉ. भारत काळे, डॉ. निर्मळ, डॉ. सुधीर काळे, डॉ. रवींद्र गंगवाल आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चोखर, संतोष शेलार, सरपंच महेंद्र साळवी, अजय डाकले, रणजित श्रीगोड, विशाल आंबेकर, बाळासाहेब दाणी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून ५ कोटी ५ लाख रुपयांचा निधी सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासनस्तरावर निधीच्या खर्चास मान्यता मिळवून दिली.
त्यातूनच तालुक्यातील बेलापूर, निमगाव खैरी व माळवाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, आमदार लहू कानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा वैद्यकीयप्रमुख अधिकारी डॉ. सांगळे यांचे सहकार्य मिळाले, असे शरद नवले यांनी म्हटले आहे.