अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे विविध मागण्यासंदर्भात २ आॅक्टोबरपासून उपोषण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. अण्णांनी केलेल्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याने अण्णा उपोषणाचा निर्णय घेणार नाहीत, अशा आशावाद गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.काही दिवसांपूर्वीच महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांशी विविध विषयांवर चर्चा केली होती. आपल्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे त्यांनी अण्णांना सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा महाजन यांनी अण्णांच्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्याने अण्णांना उपोषण करावे लागणार नाही, असे स्पष्ट केले. स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा आणि पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय झाला असून येत्या हंगामापासून तसा दर शेतक-यांना निश्चितपणे मिळणार आहे. याशिवाय, पाण्याचा प्रश्न लक्षात घेता राज्यात ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर वापरासाठी प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे. ठिबकसाठी साडे आठशे कोटी रुपये तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.केंद्र शासन स्तरावरुनही पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी अण्णांच्या मागण्यांबाबत लेखी पत्र अण्णांना दिले आहे. आता अण्णांच्या मागण्या या लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसंदर्भात आहेत. तसेच कृषीविषयक आवश्यक असणा-या वस्तूंवरील जीएसटी हा पाच टक्के करण्यासंदर्भात आहे. याबाबत केंद्र शासनाने पावले उचलली असून येत्या काही दिवसांत त्याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे, असे महाजन यांनी नमूद केले. महाजन यांनी विविध बाबींवर तब्बत तीन तास चर्चा केली.