विसापूर : उत्पन्नाची खोटी माहिती देऊन एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा प्रकार श्रीगोंदापंचायत समितीमध्ये घडला होता. याबाबत कोळगाव येथील गणेश पद्माकर गाडेकर यांनी पंचायत समितीकडे या कुटुंबाच्या चौकशीची मागणी केली होती. याबाबत पंचायत समितीने वसुलीसाठी कुटुंबाला अंतिम नोटिस बजावली आहे.
पंचायत समितीकडून सुभाष विठ्ठल पोटे यांनी रमाई आवास घरकुल योजनेतून १५ हजार व रुपाली सुभाष पोटे यांनी समाज कल्याण योजनेतून ५५ हजार रुपयांचा लाभ घेतला आहे. हे लाभार्थी बागायतदार व नोकरदार आहेत. आरणगाव दुमाला येथील सुभाष विठ्ठल पोटे, रुपाली सुभाष पोटे व गणेश विठ्ठल पोटे यांनी खोटी माहिती देऊन शासकीय योजनेतून रमाई घरकुल, कडबा कुट्टी, पीव्हीसी पाईप, झेरॉक्स मशीन, आॅईल इंजिन याचा लाभ घेतला असल्याचे तक्रारदार गाडेकर यांचे म्हणणे आहे.
लाभार्थी सुभाष विठ्ठल पोटे यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नाची चौकशी केली असता त्यांनी हेतूपुरस्कर शासनाला चुकीची माहिती देऊन शासकीय लाभ घेतला असल्याचे श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे.
सदर रक्कम वसुलीसाठी दोघांनाही अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत संबंधितांनी काही म्हणणे असेल तर सात दिवसात सादर करावे, असे नोटिसीत सूचित करण्यात आले आहे. सदर रक्कमेच्या वसुलीची नोटीस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी लाभार्थींना जारी केली आहे.