अहमदनगर : मिठाई विक्रीच्या दुकानांत सुट्या मिठाईसमोर बेस्ट बिफोरची सूचना (किती दिवसांत खावी) आणि पॅकबंद मिठाई पॅकिंगवर 'एक्सपायरी डेट' लिहिने बंधनकारक असतानाही नगर शहरातील बहुसंख्य विक्रेते या नियमाचे सर्रास उल्लंघन करताना आढळून आले आहेत. अन्न, औषध प्रशासनाचेही याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
दसरा आणि दिवाळीनिमित्त मिठाई खरेदीसाठी सध्या ग्राहकांची दुकानांत मोठी गर्दी होत आहे. दुकानांमध्ये ठेवलेली विविध आकारातील आणि आकर्षक पॅकिंगमधील मिठाई ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्यक्षात मात्र ही मिठाई कधी तयार झालेली आहे आणि ती किती दिवसापर्यंत खावी याचा कुठेच उल्लेख नसतो. नगर शहरातील बहुतांशी मिठाई दुकानदार स्थानिक ठिकाणीच मिठाई तयार करून त्याचे पॅकिंग करतात. पेढा, श्रीखंड, आम्रखंड, बटर, गुलाब जामून, रबडी, लाडू, काजू कतली अशी विविध प्रकारातील मिठाईचे पॅकिंग करून विकली जात आहे. पॅकिंग डब्बा अथवा बॉक्सवर मात्र हा पदार्थ किती दिवसापर्यंत खाता येईल याचा उल्लेख नसल्याचे 'लोकमत'ने रविवारी (दि.२५ आॅक्टोबर) केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
कोणतीही मिठाई तयार केल्यानंतर विशिष्ट कालावधीतच ती खाता येते. खराब झालेले अन्न पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या अनेक घटना नगर जिल्ह्यात समोर आल्या आहेत. पैसे कमाईसाठी मिठाई विक्रेते मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची विक्री करणाºया दुकानाची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र नगर शहरात व जिल्ह्यात मिठाई व इतर अन्नपदार्थांची विक्री करणाºया दुकानदारांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे.नामांकित कंपन्यांच्या मिठाईची दुकानदारांना एलर्जी
बाजारात विविध नामांकित कंपन्यांच्या पॅकबंद स्वरूपातील मिठाई व इतर अन्नपदार्थ उपलब्ध आहेत. या पॅकिंगवर पदार्थ तयार झाल्याची तारीख व किती दिवस वापरता येईल याचा उल्लेख असतो. कंपनीचे नाव पत्ता व संपर्क क्रमांकही दिलेला असतो. नगर शहरातील बहुतांशी मिठाई विक्रेते मात्र या नामांकित कंपनीचा माल न ठेवता स्वत: तयार केलेला माल अणि तोही नियमांचे उल्लंघन करून विकत असल्याचे आढळून आले आहे.ग्राहकांनी बिल अवश्य घ्यावेबहुतांश ग्राहक दुकानातून मिठाई खरेदी केली की बिल घेत नाहीत. दुकानदारही स्वत:हून बिल देत नाहीत. मिठाई खराब निघाली तर दुकानदार जबाबदारी झटकतात. अशावेळी ग्राहकांकडेही काहीच पुरावा राहत नाही. त्यामुळे ग्राहकांनी मिठाईसह कोणताही अन्नपदार्थ खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून पक्के बिल घेणे गरजेचे आहे.