अहमदनगर : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारांतून स्वत:ची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यातून परिसरातील शांतता भंग होऊन इतरांनाही त्रास सहन करावा लागतो. आता मात्र रस्त्यावर अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
ग्रामीण भागापेक्षा शहरात रस्त्यांवर चौकात टेबल टाकून, कारच्या बोनेटवर केक ठेवून वाढदिवस साजरा करण्याची मोठी क्रेझ आहे. यामध्ये गल्लीतील दादा, स्वयंघोषित युवा नेते आदींचा समावेश असतो. असे वाढदिवस शांततेत साजरे होत नाहीत. बहुतांशी वेळा केक तलवारीने कापला जातो. डीजे लावून आरडाओरड केली जाते. परिसरातील एखाद्या नागरिकाने अशा गुंडांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून दमदाटी अथवा मारहाणीचेही प्रकार घडतात. आता रस्त्यावर वाढदिवस साजरा करीत असल्याचे आढळून आल्यास बर्थ डे बॉयसह त्यांच्या मित्रांवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
-------------------------
.
..तर हाेईल गुन्हा दाखल
-
रस्त्यावर वाहने उभी करून केक कापणे
तलवारीने केक कापणे
डीजे-गाणी लावून रस्त्यावर गोंधळ घालणे
मध्यरात्री फटाके फोडून शांतता भंग करणे
----------------------------
रात्रीच्या वेळी कुणाकडूनही कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी शहरात व परिसरात पोलिसांची गस्त नियमित सुरू असते. रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गोंधळ घालणे, डीजे लावणे अथवा तलवारीने केक कापणे असे प्रकार आढळून आले तर आरोपींवर आर्म ॲक्ट, शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे, सावर्जनिक शांततेचा भंग करणे आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जातील.
- राकेश मानगावर, पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस स्टेशन