अहमदनगर : आशियाई कुस्ती स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात रौप्यपदक पटकावल्यामुळे आत्मविश्वास उंचावला असून, आता आॅलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावण्यासाठी मेहनत घेणार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या आॅलिंपिकची तयारी सुरु आहे. या आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारच, असा विश्वास श्रीगोंदा येथील कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिने व्यक्त केला.नुकत्याच जपान येथे झालेल्या आशियाई सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावणारी श्रीगोंद्याची कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिचे नगरमध्ये आगमन होताच तिने प्रथम ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रशिक्षक किरण मोरे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, कुस्तीपटू धनश्री फंड, बापूराव फंड, शिवराज रोडे, बापूराव निंभोरे, बाळासाहेब मुंडफण, सरपंच सोन्याबापू कानगुडे, पोपट डांगे, मुबारक शेख, भरत भांडवलकर आदी उपस्थित होते.जपान येथून दिल्ली विमानतळावर आल्यानंतर भाग्यश्री रेल्वेने नगरला आली़ नगर येथे रेल्वे स्थानकाबाहेर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात तिच्या खेळाचे नगरकरांनी कौतुक केले. जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी, टाकळी लोणार व कोळगावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. रेल्वे स्थानकावरील स्वागत स्वीकारल्यानंतर भाग्यश्री थेट ‘लोकमत’ कार्यालयात पोहोचली. ‘लोकमत’मध्ये सत्कार स्वीकारल्यानंतर तिने ‘लोकमत’शी संवाद साधला.भाग्यश्री म्हणाली, देशाबाहेर खेळल्यामुळे तिकडच्या महिला खेळाडूंचा अनुभव, त्यांची खेळण्याची पद्धत समजते. आपल्याला नक्की पुढे कशा पद्धतीने सराव करायचा आहे, याची दिशा निश्चित करता येते़ तिकडे शिस्तीला खूप महत्व आहे. खूप कमी वयात आशियाई स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावला असून, पुढील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द ठेवून सराव करणार आहे़ सध्या पुण्यात सराव सुरु आहे. २०२४ मध्ये होणा-या आॅलिंपिकची तयारी आतापासून करत आहे़ त्यामुळे आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हेच माझे ध्येय आहे, असे ती म्हणाली.
भाग्यश्रीकडे परिश्रम घेण्याची तयारी आणि जिद्द आहे़ ती कठोर मेहनत घेत आहे़ व्यायाम आणि सराव ती कधीही चुकवत नाही़ कमी वयात तिने मोठे यश मिळविले आहे़ आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची तिच्यामध्ये क्षमता आहे.-किरण मोरे, भाग्यश्रीचे प्रशिक्षक
भाग्यश्रीला अधिक दर्जेदार, अद्ययावत प्रशिक्षण मिळावे, योग्य आहार मिळावा, तिचे जास्तीत जास्त प्रशिक्षण परदेशात व्हावे, यासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडे प्रयत्न करीत आहे़ नगरमध्ये नरेंद्र फिरोदिया यांनी भाग्यश्रीला मदतीचा हात दिला आहे़ नगरमध्येच अद्ययावत कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरु व्हावे, असाही प्रयत्न सुरु आहे.-वैभव लांडगे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष