कोपरगाव : प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण करीत कोपरगाव शहरातील अगदी सर्वसामान्य कुटुंबातील भाग्यश्री वालडे हिची नुकतीच बँक ऑफ अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील मुख्य कार्यालयात सिनियर डेक असोसिएट या अधिकारी पदावर निवड झाली आहे. यासाठी तिला ३२ लाख ५० हजारांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे. पुढील वर्षात ती रुजू होणार आहे.
भाग्यश्रीचे शालेय शिक्षण शहरातील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर येथे झाले. २०१६ साली दहावीला ९१.२० टक्क्यांनी उत्तीर्ण झाली व त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण संजीवनी केबीपी पॉलिटेक्निक २०१९ येथे तर पदवीचे शिक्षण मुंबई येथील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयात शिक्षण सुरू असून मे २०२२ मध्ये पूर्ण होणार आहे. भाग्यश्री लहानपणापासून हुशार आहे. अभ्यासाची आवड आणि काही तरी करून दाखवायची जिद्द होती. आणि त्याचे फळ तिला आज मिळत आहे. कष्ट करण्याची तयारी असली, तर सर्व काही शक्य आहे. हेच भाग्यश्रीने दाखवून देत इतर विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात छोट्याशा खोलीत राहणार वालडे कुटुंब राहते. भाग्यश्रीचे वडील ज्ञानेश्वर वालडे हे शहरातील विष्णू चित्र मंदिर समोर वडापाव विकतात तर आई सोनल वालडे या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. भाग्यश्रीला बहीण दीपाली आणि श्रावणी व सुशांत असे तीन भाऊ-बहीण आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत वालडे दाम्पत्याने मुलींचे शिक्षण केले आहे.
............
आत्मविश्वास व बुद्धिमत्तेच्या जोरावर या जगात काही अशक्य नाही. मग तुमची परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्याने काही फरक पडत नाही. यश गाठण्यासाठी परिस्थिती कधीच स्पीडब्रेकर असू शकत नाही. अभ्यासात हुशार असण्याबरोबरच हिंमत महत्त्वाची आहे. कारण, आपल्यातील हिमतीतूनच अशा अशक्य गोष्टी शक्य होतात.
- भाग्यश्री वालडे, कोपरगाव
..........
फोटो२५- भाग्यश्री वालडे - कोपरगाव