अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी भंडारदरा जलमंदिर शुक्रवारी सांयकाळी ९३ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणातुन १ हजार ९१५, तर निळवंडे धरणातून २ हजार ४०० क्ययुसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.
धरणातून विद्युत निर्मिती करिता ८३५ क्ययुसेकने तर स्पिलवे गेटमधून १०९० क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. ११ हजार ०३९ दशलक्ष घनफूट साठा क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी नियंत्रित ठेवत सायंकाळी सहा वाजता १० हजार २६४ घनफुटावर स्थिर करण्यात आला. धरणाची पाणी पातळी २१२.४४ फुटावर ठेवण्यात आली आहे. उशिराने मान्सून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात दाखल होऊन स्थिरावला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण दोन दिवसांमध्ये तांत्रिकदृष्ट्या भरले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने निळंवडे धरण पाणी साठा ६८११ (८१ टक्के) दशलक्ष घनफुटवर पोहचला आहे.