अहमदनगर : भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा धरणाकडे १० हजार २६ क्युसेकने आवक सुरू असून पाण्याचा साठा ५६ टक्के झाला आहे. तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठाही ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात कळसूबाई शिखराच्या परिसरातही पावसामुळे ओढे-नाले वाहत आहेत. कृष्णावंती नदीच्या वाकी धरणावरून १ हजार ५७४ क्युसेकने पाणी वाहत आहे. साम्रद, रतनवाडी, घाटघर, पांजरे या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. घाटघर येथे सात इंच पाऊस पडला, तर रतनवाडी येथेही साडेसहा इंच पावसाची नोंद झाली. जोरदार पाऊस व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. काही ठिकाणी घराची छते उडाली आहेत.
मुळा धरणाचा मागील वर्षाचा अतिरिक्त साठा दोन हजार दशलक्ष घनफूट उपलब्ध होता. यंदा पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रावर दरवर्षी साधारणपणे हजार मिलीमीटर पाऊस होतो. यंदा सरासरी इतका पाऊस पडला आहे. मुळा धरणाकडे १० हजार क्युसेकने आवक सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. ऑगस्टमध्ये मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरुन जायकवाडीला यंदाही पाणी सुटण्याची शक्यता आहे.
...........................
भंडारदऱ्यातून ५०२ क्युसेकने विसर्ग
गुरुवारी सकाळी दहा वाजता अंब्रेला धबधब्यातून प्रवरा नदीमध्ये ५०२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८ हजार ८५१ दशलक्ष घनफूट झाला आहे.