अकोले/राजूर: भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी सोमवारी दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात आलेले हे दुसरे आवर्तन असून हे आवर्तन सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला.कालवा सल्लागार समितीच्या नियोजना प्रमाणे सोमवारी दुपारी बारा वाजता निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात 1 हजार 500 कुसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.भंडारदरा धरणातून या पूर्वीच निळवंडे धरणात पाणी सोडण्यात येत होते.भंडारदऱ्यातून वीज निर्मितीसाठी 830 कुसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.सोडण्यात येणारे हे पाणी निळवंडे धरणात येत असते. शेतीसाठी सोडण्यात येणारे हे आवर्तन सुमारे पंचवीस दिवस चालणार असून या कालावधीत सुमारे 3 हजार ते 3 हजार 400 दशलक्ष घनफुट पाण्याचा वापर होईल असा अंदाज भंडारदराचे शाखा अभियंता देशमुख यांनी व्यक्त केला. पाणी सोडते वेळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा 6 हजार 575 दशलक्ष घनफुट इतका होता तर निळवंडेतील पाणीसाठा 4 हजार 374 दशलक्ष घनफुट होता.