अहमदनगर : राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या शनिवारी झालेल्या नगर येथील सभेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपचे नेते अशोक भांगरे यांनी राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे हे व्यासपीठावर उपस्थित होते. अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे अकोले मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, पिचड विरोधक असलेले अशोक भांगरे यांनी शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्टवादी काँग्रेस प्रवेश केला. तर किरण लहामटे हे अकोले येथे २१ रोजी होणा-या राष्टवादीच्या मेळाव्यात प्रवेश करणार आहेत. शनिवारी दुपारी महाराष्ट विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अकोले येथे नेहमीप्रमाणे पिचड-भांगरे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे समर्थक असलेले पिचड कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पवार यांचेही अकोलेत राष्टवादी बळकट करण्यासाठी सर्वाधिक लक्ष राहणार आहे.
भांगरे, लहामटे यांचा राष्टवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:57 PM