रूईछत्तीसी : नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भापकर यांनी नुकताच पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी शशिकांत गाडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याने गुंडेगाव गणातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यांना उपसभापतीदाची पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
भापकर यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून उपसभापती पदावर काम करत असताना गुंडेगाव गणात अनेक विकासकामे मार्गी लावली. उपसभापती पदावर त्यांची निवड झाली आणि कोरोना लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे त्यांना लोकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडविता आल्या नाहीत. गणातील १४ गावांमध्ये त्यांनी गायीगोठा, काँक्रीटीकरण, कडबा कुट्टी, शिलाई मशीन अशा व्यक्तिगत लाभाची आणि सामाजिक लाभाची कामे मार्गी लावली. अद्यापही गणात बऱ्याचशा समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी त्यांना या पदावर काम करण्यास संधी मिळायला हवी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु, ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सुपूर्द केला आहे.
गुंडेगाव गणाची रचना झाल्यापासून या गणाला रवींद्र भापकर यांच्या माध्यमातून उपसभापतीपद मिळाले होते. याअगोदर या गणातून कोणालाही सभापती, उपसभापतीपदावर काम करण्याची संधी देण्यात आली नाही. अजूनही त्यांना या पदावर काम करण्याची संधी हवी होती. त्यांच्या राजीनाम्याने गुंडेगाव गणातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
---
कोरोनामुळे लोकांच्या हिताची जास्त कामे करता आली नाहीत. या पदाच्या माध्यमातून अजूनही काम करण्याची इच्छा होती. नगर तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांची कामे करता आली. मात्र, लोकांपर्यंत पोहोचता आले नाही. ही खंत कायम आहे. तरीही पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य आहे.
-रवींद्र भापकर,
उपसभापती, पंचायत समिती, नगर
---
रवींद्र भापकर यांनी गुंडेगाव गणाचा कायापालट केला आहे. सर्वसामान्य जनतेची कामे त्यांनी मार्गी लावली. उपसभापतीपदावर काम करण्याची त्यांना आणखी संधी द्यायला हवी. तरीही तालुका महाविकास आघाडी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
-वाल्मिक नागवडे,
माजी सरपंच, गुणवडी, ता. नगर