खरीप हंगामासाठी मका, बाजरी, सोयबीन, कपाशी, तूर, मूग व इतर बियाणे विक्री केंद्रावर विक्रीकरिता उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घेणे आवश्यक आहे. अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह बियाणे खरेदी करावी. पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट क्रमांक, बियाणे कंपनीचे नाव, अंतिम दिनांक, खरेदीदाराचे संपूर्ण नाव आदी बाबी तपासून घ्याव्यात. बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. सीलबंद बियाणे पाकीट खरेदी करावे. खरेदी केलेल्या बियाण्याचे पाकीट, मूळ पावती तसेच थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बियाणे उगवण कमी झाल्यास पेरणी झाल्यापासून दहा दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कृषी कार्यालय येथील तक्रार निवारण कक्षात पावतीचे झेरॉक्स जोडून लेखी स्वरूपात तक्रार करावी.
--------------
काही कंपन्यांच्या खतांचे दर वेगवेगळे आहे. खरीप हंगामामध्ये आवश्यक रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. रासायनिक खते खरेदी करताना दराबाबत सावधानता बाळगावी. खते खरेदी करताना आधार कार्ड क्रमांक व मोबाइल क्रमांक सांगून ऑनलाइन प्रणालीद्वारे पॉस मशीनवरच खते खरेदी करावी. जास्त दराने खताची विक्री होत असल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क करावा.
- किरण अरगडे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, संगमनेर