शिर्डी : कोरोनाच्या धास्तीने रोजी-रोटीकडे पाठ करून हजारो मजूर आपल्या मातीत परतत आहेत. कोपरगाव, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील ११०४ मजुरांना घेवून शुक्रवारी (दि.२२ मे) मध्यरात्री साईनगरीतून पाचवी श्रमीक रेल्वे बिहारला रवाना झाली. यावेळी मजुरांनी भारत माता की जय...वंदेमातरम व साईबाबांच्या नावाचा जयघोष केला. या मजुरांचा स्वगृही परतण्यासाठी रेल्वे प्रवासाचा खर्च राज्य सरकारने केला आहे. यासाठी ७ लाख, ७२ हजार ९२० रूपये खर्च आला. घरी परतण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणा-या प्रशासनाला व परतीचे भाडे भरणा-या राज्य शासनाला धन्यवाद देत या मजुरांनी शुक्रवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजता घरची वाट धरली. साईनगरीतून यापूर्वी उत्तरप्रदेशला चार श्रमिक रेल्वेतून ५७३१ मजूर स्वगृही परतले आहेत. गेल्या सोळा दिवसात पाच रेल्वेद्वारे परराज्यातील ६८३५ मजूर आपआपल्या घरी परतले आहेत. यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, संगमनेर तहसीलदार अमोल निकम, कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीचे मुख्याधिकारी सतिष दिघे, कोपरगावचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, एम़बी़ देसले, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, रेल्वेचे स्थानकप्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मिना उपस्थीत होते.रेल्वेतील मजुरांना संस्थानच्या वतीने सीईओ अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी अन्नाची पाकिटे दिली. परिवहन महामंडळाने कामगारांना रेल्वे स्थानकावर पोहोचवण्याची व्यवस्था केली.२०० मजुरांचा घरी परतण्याचा निर्णय रद्दबिहारला स्वगृही परतणा-या मुलांमध्ये राहाता तालुक्यात राहाता व निर्मळ पिंप्री येथे मदरशामध्ये शिक्षण घेत असलेल्या ८६ मुलांचा समावेश आहे. कामे सुरू झाल्याने जवळपास दोनशे मजुरांनी घरी परतण्याचा निर्णय रद्द केला. मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष प्रमुख उर्मिला पाटील, संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदींनी पाठपुरावा केला.
भारत माता की जय..साईनामाचा गजर करीत बिहारच्या मजुरांची घरवापसी: साईनगरीतून पाचवी रेल्वे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:41 AM