अहमदनगर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण क्षेत्रात मुलभूत पायाभरणी करण्याचे काम महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या दांपत्याने केले. महात्मा फुले हे थोर समाज सुधारक होते. फुले दांपत्याला केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करावे, अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली.
महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत जयंतीनिमित्त काँग्रेसच्या कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माळीवाडा वेस येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. काळे म्हणाले, फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होत आहे. भाजपने देखील आपले सरकार नसताना ही मागणी केलेली आहे. आता तर केंद्रात त्यांचे सरकार आहे. केवळ राजकीय दृष्ट्या या विषयाकडे न पाहता फुले दांपत्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्राने हा पुरस्कार या दांपत्याला जाहीर केला पाहिजे.
ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांचा या महाराष्ट्रात जन्म झाला ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. महात्मा फुले हे ओबीसी समाजाबरोबरच सर्व समाज घटकांसाठी आदर्श आहेत. त्यांना समाजाच्या सर्व घटकांमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या विचारांची जपणूक करणे आणि तरुण पिढीला यातून दिशा दाखविणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, शैलाताई लांडे, जिल्हा सरचिटणीस मनसुखभाई संचेती, रतिलाल भंडारी, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, युवक सरचिटणीस आकाश आल्हाट, अभिनय गायकवाड इंजिनिअर सुजित क्षेत्रे, तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, युवक शहर संघटक विनोद दिवटे, युवक शहर जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ, सुहास त्रिभुवन, रामभाऊ धोत्रे, ब्लॉक काँग्रेस कमिटी सदस्य हनीफ मोहम्मद जहागीरदार, आप्पासाहेब लांडगे, सागर दळवी आदी उपस्थित होते.