नेवासा : श्री क्षेत्र देवगडचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांनी मंगळवारी अयोध्येला पोहचल्यानंतर न्यास कार्यशाळेत जाऊन मंदिरासाठी उभारण्यात येणाऱ्या शीलांची पहाणी केली.
महाराज हे मंगळवारी सकाळी अयोध्येला पोहचले. अयोध्या येथे राम मंदिर न्यास समितीचे कोषाध्यक्ष महंत गोविंदगिरी महाराज यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत त्यांची बैठक झाली. त्यानंतर मंदिर उभारणीसाठी घडविण्यात आलेल्या शीलान्यास कार्यशाळेत जाऊन त्यांनी पहाणी केली, अशी माहिती भास्करगिरी महाराजांच्या समवेत गेलेले विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री सुनील चावरे यांनी दिली.
महाराष्ट्रातून भिडे गुरुजी यांनी दिलेल्या ५२ किल्ल्यांची माती विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय धर्माचार्य संपर्क प्रमुख अशोक तिवारी, विनायक देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केली.तर विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री रविदेवजी आनंद यांच्याकडे नेवासा तालुका भूमीतील माती व जल ही यावेळी सुपूर्त करण्यात आले. देवगड येथील संदीप साबळे व सुनील चावरे हे भास्करगिरी महाराज यांच्या समवेत आहेत.