अहमदनगर : सोमवारी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे किरकोळ वादातून झालेल्या दगडफेक, तोडफोडीचे पडसाद बुधवारी सलग दुस-या दिवशीही नगर जिल्ह्यात उमटले असून, महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत नगर जिल्ह्यात बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनर्त्यांनी दूध संघांची कार्यालये फोडली तर काही ठिकाणी एस टी बस फोडल्या. नगर शहरातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नेप्ती कांदा मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. मार्केटमध्ये आलेल्या कांद्याचे गुरुवारी सकाळी अकरा वाजता लिलाव होणार असल्याचे सांगण्यात आले.जामखेड तालुक्यातील जवळा येथे सात वाजण्याच्या सुमारास जामखेड-करमाळा बसवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. जवळा येथील बंदला हिंसक वळण मिळाले असून, क्रांती ज्योती दूध संघाच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. तसेच दूध ओतून देण्यात आले. जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, खर्डा, नान्नज, अरणगाव, सोनेगाव, हळगाव, जातेगाव, दिघोळ आदी गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे कडकडीत बंद पाळून गावात निषेध रॅली काढण्यात आली. म्हैसगाव सकाळपासून बंद पाळण्यात आला.
पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणी बंद पाठण्यात आला. ढवळपुरी, भाळवणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. पारनेर एस. टी. आगार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. निघोजमध्ये शांतता असल्याचे सांगण्यात येते.नगर तालुक्यातील निंबळक, इसळक, जेऊन येथे बंद पाळण्यात आला.श्रीगोंदा तालुक्यातील कडकडीत बंद पाळण्यात आला. टाकळी कडेवळीत व मांडवगण वगळता इतर मार्गावरील बसेस सुरु असल्याचे सांगण्यात येते.संगमनेरमध्येही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शासनाच्या निषेधार्थ संगमनेर शहरात रॅली काढण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
शाळांना अघोषित सुट्टी
अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. विद्यार्थ्यांअभावी शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे जे विद्यार्थी शाळेत पोहोचले होते, त्यांनाही पुन्हा घरी परतावे लागले.