अनिकेत यादव। भिंगार : भिंगार (ता.नगर) येथील छावणी परिषदेचे वर्कशॉप, जनावरांचा दवाखाना मद्यपींचा अड्डा बनला आहे. येथे दारूच्या रिकाम्या बाटल्या, कच-याचे साम्राज्य आढळून येते. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.भिंगार येथील वर्कशॉपमध्ये जनावरांचा दवाखाना आहे. मात्र येथील दवाखान्याचा बोर्ड नावालाच उरला आहे. दहा वर्ष झाले येथील दवाखाना बंद पडलेला आहे. हा दवाखाना राज्य शासनाने चालविण्यास घेतला होता. मात्र तो अल्पावधीतच बंद पडला. त्यानंतर येथील नागरिकांनी हा दवाखाना सुरू करण्यासाठी छावणी परिषदेला अनेकदा निवेदने दिली. मात्र हा दवाखाना सुरू झाला नाही. दरम्यान, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने वर्कशॉपची संरक्षण भिंत ठिकठिकाणी पडली आहे. त्यामुळे चोरांना सहज प्रवेश मिळतो. येथील काही वस्तूंची चोरीही झाली आहे. सध्या हे संपूूर्ण वर्कशॉपच कच-यात असल्यासारखे आहे. दरेवाडी (ता. नगर) येथे छावणी परिषदेचा कचरा डेपो आहे. भिंगारमधून कचरा गोळा करून छावणी परिषदचे कर्मचारी वर्कशॉप परिसरात कचरा टाकतात. त्यामुळे येथे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वर्कशॉपला वेड्याबाभळींनी वेढा दिला आहे. तेथे कधी साफसफाईही केली जात नाही. येथे मद्यपींचाही वावर असतो. भरदुपारीच काहींच्या दारू पार्ट्या असतात. त्यामध्ये काही छावणी परिषदेचे कर्मचारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्या आवारात रिकाम्या दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात.
छावणी परिषदचे कर्मचारी वर्कशॉपमध्ये दारू पितांना आढळल्यास निलंबित करण्यात येईल. येथे असे प्रकार होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करू. संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधण्यात येईल. दरेवाडीचा रस्ता खराब असल्याने लहान गाड्या जात नाहीत. त्यामुळे हा कचरा येथे टाकला जातो. लवकरच हा कचरा दरेवाडी डेपोतच टाकण्याचे नियोजन करू. बंद पडलेला जनावरांचा दवाखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.-विद्याधर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी परिषद, भिंगार.