भिंगार : भिंगार येथील नगर- पाथर्डी रस्त्यावरच शुक्रवारचा आठवडे बाजार भरत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याचा स्थानिक रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागतो. याकडे छावणी परिषदेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
भिंगार येथील आठवडे बाजारात स्वस्त किमतीत घरगुती वापराच्या वस्तू आणि भाजीपाला मिळतो. त्यामुळे येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची गर्दी असते.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याअगोदर भिंगारमधील शुक्रवारचा आठवडे बाजार पाण्याच्या टाकी खाली वर्षानुवर्षे भरत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत हा आठवडे बाजार नगर- पाथर्डी रस्त्यावरच भरू लागला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विक्रेते बसतात, तसेच काही खरेदीसाठी येणारे नागरिकही वाहने रस्त्यातच उभी करून खरेदी करतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होऊन वादाचे प्रसंगही घडतात. या प्रकारामुळे येथील स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे शुक्रवारी भिंगारमध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याकडे छावणी परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आठवडे बाजार पुन्हा पाण्याची टाकी खाली भरविण्याची मागणी हाेऊ लागली आहे.
---
१९ भिंगार
भिंगार येथे नगर- पाथर्डी रस्त्यावर भरत असलेला आठवडे बाजार.