भज गोविंदम -९------------------मनुष्य जीवनाचे जन्मापासून काही महत्वाचे भाग पडतात. बालपण, तरुणपण आणि वृद्धापकाळ या तीनही स्तरातून मानव जेव्हा जातो तेव्हा त्याची संसार आसक्ती सुटत नाही. आयुष्य किती आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. पण आपण उद्या जिवंत आहोत, असाच सर्वांना भ्रम असतो. ब्रह्म भिन्नम सर्व मिथ्याह्ण, असे वेद सांगतो. ब्रह्म खरे आहे. बाकी सर्व मिथ्या आहे. खरे आहे असे फक्त भासते. पण प्रत्यक्ष अनुभव घेतला तर मात्र ते खोटे ठरते. जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज म्हणतात, ज्जू सपार्कार भासियाले जगडंबरह्ण, संध्याकाळचे वेळी दोरीवर सर्प भ्रम होत असतो. कारण आधी दोरी होती खरी. सर्प कल्पना उमटे दुसरीे, तैसे सत्य अधिष्ठानावारी जगत कल्पना उमटे. (एकनाथ महाराज).दोरीचे दोरीरूपाने ज्ञान न होता ते सर्परूपाने अन्यथा ज्ञान (विपरीत ज्ञान) होते. तसेच जगत खरे तर नाही. पण ब्रह्मस्वरूप अधिष्ठानावर जगात कल्पना भासत असते व ते सत्य रूपाने भासत असते. कल्पनेला सत्यत्व दिले की, दु:ख होणारच. कासया सत्य मनिला संसार का हे केले चार माझे माझे. जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा तू संसार का सत्य मानला ? माझे माझे का म्हणालास ? याला कारण फक्त अज्ञान आहे. अरे तुज्या जीवनात किती स्थित्यंतरे झाली हे तुला तरी कळले का ?बालपण गेले नेणता, तरुणपणी विषयव्यथा, वृद्धपाणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म धरी. संत सांगतात की हे जीवा तुझे बालपण अज्ञानातच गेले व तरुणपणी विषयासक्ती तुला जडली व तू त्यातच आसक्त झालास. माउली म्हणतात, विषयाचे समसुख बेगाडाची बाहुली. अभ्राची साऊली जाईल रया. या विषयाचे सुख हे भासमान असते. ते प्राप्त करताना दु:ख, प्राप्त जरी झाले तरी रक्षणाचे दु:ख, व नष्ट झाले तर आणखी दु:ख.भर्तुहरी म्हणतोह्यभोगा न भुक्ता वयमेव भुक्ता: तपो न तप्तं वयमेव तप्ता: ।कालो न यातो वयमेव याता:, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा:आम्ही भोग भोगीत नाही तर भोगच आम्हाला भोगतो. आपल्याला वाटते की, आपण गुलाबजाम खातो पण तोच गुलाबजाम मात्र आपल्याला भोगीत असतो. तो आपली शुगर वाढवतो व मधुमेहाचा रोगी बनवतो. असेच पंचविषयातील भोग आपण भोगीत नसून ते भोगच आपल्याला भोगीत असतात. तापच आपणास तप्त करीत असतो. काळ आपल्याला खात असतो, हे लक्षातच येत नाही. आपली तृष्णा जीर्ण होत नाही, आपण जीर्ण होतो.आचार्य आपणास हे अंतिम सत्य सांगतात, की तू वृद्धापकाळापर्यंत आलास पण तुला तुझे खरे हित अजून कळले नाही. विचारहीन माणसाच्या जीवनात साधारण क्रीडा, भोगासक्ती आणि दु:ख या तीन मयार्दा आहेत. निसर्गत: कोणीही मनुष्य, प्राणी कालप्रवाहाच्या विरुध्द जावू शकत नाही. पण तो त्यावेळी सावध मात्र होऊ शकतो. जीवनाच्या संध्याकाळी म्हणजेच म्हतारपणी तरी सावध व्हावे. ज्ञानेंद्रिये ही स्वभावात: बर्हिर्मुख आहेत. म्हणूनच शम, दम साधून परब्रह्मस्वरूपाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. इंद्रियांना अंतर्मुख करून जीवब्रह्मैक्य साधून घेऊन कृतार्थ व्हावे यातच खरे हित आहे.-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागावाताश्रम, चिचोंडी(पाटील),जि. अहमदनगर, मोब. ९४२२२२०६०३