अहमदनगर : पुणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने आज पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक केली आहे. बबन सीताराम ठुबे असे अटक केलेल्या भोंदूचे नाव आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अश्विन जनार्दन भागवत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना भेटून बबन ठुबे या भोंदूबाबाच्या कृत्याविषयी तक्रार केली होती. ठुबे हा डॉक्टर असल्याचे भासवून व जादूटोणा करून विविध आजार बरे करण्याचे सांगत अनेकांची फसवणूक करत होता. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने, कॉन्स्टेबल काळे, मोहन गाजरे, रवींद्र कर्डिले, सागर सुलाने, योगेश सातपुते, सचिन कोळेकर यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते अश्विन भागवत, मनिषा म्हात्रे, अलका आरळकर हे कान्हूरपठार येथे ठुबे याच्याकडे ग्राहक बनून गेले. यावेळी ठुबे याने जादूटोणा सुरू करताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरातून काळ्या बाहुल्या, पंचागाचे चित्र, एक स्टेटथस्कोप, पांढ-या कवड्या, काळे बिबवे, अक्रोड, लाल पिवळा पंचरंगी दोरा, अश्वगंध पावडर, त्रिफळा चूर्ण व इतर जादूटोण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी अश्विन भागवत यांच्या फिर्यादीवरून ठुबे याच्यासह त्याला मदत करणारे लताबाई बबन ठुबे, विजय बबन ठुबे, सुनीता खोडदे, रोहिणी खोडदे, माधव सोनावळे, अण्णा सोनावळे (सर्व़ रा़ कान्हूर पठार) यांच्यावर कलम ४२० सह महाराष्ट्र जादूटोणा कायदा कलम २ (२), २ (१०) प्रमाणे पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मुलींचे वशिकरण करण्यासाठी सांगायचा उपायबबन ठुबे हा मुलगी नांदत नसल्यास, मुले होत नसल्यास तसेच मुलींचे वशिकरण कसे करावे, यासाठी राख, कोळसे याचा वापर करून जादूटोणा करत होता. या माध्यमातून त्याने अनेकांची फसवणूक केली होती़ तसेच तो स्वत: डॉक्टर असल्याचे त्याच्याकडे येणा-या रूग्णाला सांगत होता. ठुबे याच्या या कृत्याबाबत अंनिसचे कार्यकर्ते भागवत यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून ठुबे याचा भंडाफोड केला.
भोंदुबाबाला अटक : सात जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 5:29 PM