जामखेड : दोन ऑक्टोबरला सोलापूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग व आढळगाव-जामखेड महामार्गाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर येथे होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांची दिली.
१५ ऑक्टोबर रोजी खर्डा (ता. जामखेड) येथील किल्ल्याच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच ‘ स्वराज्य ध्वज ’ हा कार्यक्रम राजकीय नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक संत, राजे, महाराजांच्या वंशजांचे या भूमीला पाय लागणार आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक या कार्यक्रमात एकत्र सहभागी होणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.
जामखेड येथे ‘स्वराज्य ध्वज ’ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शनिवारी जामखेड येथे कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, विजयसिंह गोलेकर, श्रीकांत लोखंडे, उमर कुरेशी, वैजीनाथ पोले, हरिभाऊ आजबे, वसीम कुरेशी आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, या भगव्या स्वराज्य ध्वजामुळे परिसराची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. या ध्वजाचे पूजन कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात होणार आहे. येथे इतरही पर्यटन सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामुळे देशभरातून पर्यटक येतील. परिसरात रोजगार, व्यवसाय वाढतील.
मतदारसंघाच्या विकासासाठी व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. नगर-सोलापूर व श्रीगोंदा-जामखेड महामार्गाच्या कामाचे दोन ऑक्टोबरला नगर येथे भूमिपूजन होणार आहे. यावेळी शरद पवार व नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.
----
एक हजार रक्त पिशव्या संकलन..
सध्या राज्यात नऊ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून गावोगावी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. आतापर्यंत हजाराहून अधिक रक्त पिशव्या जमा झाल्या आहेत.
250921\img-20210924-wa0044.jpg
आ. रोहीत पवार स्वराज्य ध्वज नियोजन बैठकीत बोलताना