राजूर: अकोले तालुक्यातील पाभूळवंडी येथील उगलेवाडीत गोठ्यात घुसला होता. हा बिबट्या गोठ्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला पकडण्यासाठी संगमनेर येथील रेस्क्यू टीम पोहोचण्याआधीच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदनानंतरच समजणार असल्याचे शेणीत येथील वनपरिमंडल अधिकारी मधुकर चव्हाण यांनी सांगितले.शुक्रवारी (दि.२० मार्च) सायंकाळी चारच्या सुमारास हा बिबट्या उगलेवाडीतील किसन सखाराम जाधव यांच्या गोठ्यात घुसला. या गोठ्यातील एक गोºहा जखमी केल्यानंतर त्याचठिकाणी तो एक ते दीड तास बसला होता. वनविभागाची टीम तेथे दाखल झाली. तेव्हा तो गोठ्यातून बाहेर पडला होता. यावेळी ठराविक अंतर चालून गेल्यावर तो बसत असल्याचे वनविभागाच्या कर्मचा-यांच्या लक्षात आले होते. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. याचवेळी वनविभागाच्या अधिका-यांनी संगमनेर उपविभागीय वनाधिकारी ए.पी.तोरडमल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याला भूल देऊन ताब्यात घेण्यासाठी रेस्क्यू टिमला पाचारण केले होते. यावेळी राजूर येथील वनपाल बी.एस.मुठे, चंद्रकांत तळपाडे, वनरक्षक व्ही. एन.पारधी, बी. के. बेनके, व्ही. पी. व्हरगळ, वाय. आर.परते हे वनक्षेत्रपाल दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. मात्र कार्यवाही सुरू करण्या पूर्वीच बिबट्याचा मृत्यू झाल्याचे त्यांना आढळून आले.
बिबट्याचा मृतदेह सुगाव येथील नर्सरीत शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या अहवालानंतर त्याचा मृत्यू कशामुळे झाला? हे निष्पन्न होईल, असे परिमंडळ अधिकारी मधुकर चव्हाण यांनी सांगितले.