उक्कलगाव : श्रीरामपूर तालुक्यातील चांडेवाडीत दत्तात्रय म्हसे या शेतक-याच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंज-यात शनिवारी बिबट्याची एक मादी पिंज-यात अडकली. अडकलेली ही मादी बछड्याच्या शोधात होती. बिबट्याला पकडण्यासाठी अनेक दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत होते.बिबट्याच्या दहशतीमुळे गळनिंबसह प्रवरा परिसरात घबराट पसरली आहे. लहान मुलांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. ज्ञानेश्वरी मारकड ही तीन वर्षे वयाची मुलगी बिबट्याने ठार केली होती. अनेक पिंजरे लावल्यानंतरही बिबटे वनविभागाच्या पिंज-यात अडकत नव्हते. उक्कलगावसह गळनिंब, कुरणपूर, फत्याबाद, मांडवे, एकलहरे, ममदापूर, कडीत या प्रवरा नदीपात्रा शेजारील गावांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. चांडेवाडीत येथे ड्रोन कॅमेरा लावण्यात आला होता. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. चांडेवाडी येथील दामुजी गाडेकर यांच्या उसाच्या शेतात ऊसतोडणी कामगारांना नुकतेच बिबट्याचे दोन बछडे सापडले होते. ते वनविभागाच्या पिंज-यात ठेवण्यात आले होते. त्याच बछड्याच्या शोधातच असलेली मादी बिबट्या शनिवारी अलगद पिंज-यात अडकली. वनविभागाचे नगरचे उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर वनविभागाचे रमेश देवखिळे, कोपरगावचे वनक्षेत्रपाल संतोष जाधव, वन अधिकारी गाढे, दक्षता पथकाचे विकास पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मादी बिबट्या व बछडे ताब्यात घेतले. बिबटया पिंजºयात अडल्याची माहिती कळताच चांडेवाडीतील नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाला मदत करण्यासाठी अमोल म्हसे, कोमल गिरमे आदींसह चांडेवाडीतील नागरिकांनी मदत केली. बिबट्यास जेरबंद केल्यानंतर तिला राहुरी येथील नर्सरीत नेण्यात आला. तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुणे जिल्ह्यातील जुन्नर उद्यानात किंवा कोतुळ येथील उद्यानात नेणार असल्याचे वन अधिका-यांनी सांगितले.
चांडेवाडी येथे पिंज-यात अडकला बिबट्या; एक बछडा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 5:29 PM