- शिवाजी पवार
अहमदनगर - श्रीरामपूर नेवासा महामार्गावर वडाळा महादेव दुधाच्या टँकरचा टायर फुटल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची त्याला धडक बसून तरुण जागीच ठार झाला. या दुर्घटनेत एक रिक्षाही रस्त्याच्या बाजूला उलटली. मात्र रिक्षाचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.
मंगळवारी रात्री हा अपघात झाला. मयत दुचाकीस्वाराचे नाव बाबासाहेब चंद्रकांत रणदिवे (वय २४, रा.वॉर्ड क्रमांक ६, श्रीरामपूर) असे आहे. या विचित्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
टँकरचा (एमएच १४ डीएम ६८९८) टायर फुठल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. टँकरचा वेग अचानक कमी झाला. पाठीमागून येणाऱ्या रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत रिक्षा रस्त्याच्या खाली घेतली. मात्र रिक्षाच्या पाठीमागून आलेली दुचाकी (एमएच १७ सीबी २७२२) थेट टँकरवरच जाऊन आदळली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रणदिवे यांना शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
टँकर चालकाने घटनेनंतर पसार होण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला एक किलोमीटर पाठलाग करून पकडले. टँकर पाथर्डी तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष परदेशी तपास करत आहेत.