अहमदनगर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुलैमध्ये पाहणी करून ४५ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केल्याचा अहवाल दिलेला असताना स्वच्छ सर्वेक्षणच्या संकेतस्थळावर त्यापूर्वी म्हणजे एक महिनाआधीच जूनमध्ये हे काम ७९ टक्के पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड केले गेले. त्यामुळे साठविलेल्या किती कचऱ्यावर प्रक्रिया झाली, असा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे.
महापालिकेचा बुरुडगाव येथील कचरा डेपो परिसरातील शेतकरी राधाकिसन कुलट यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेल्या तक्रारीतून ही बाब समोर आली आहे. शहर व परिसरातील कचरा संकलन करून तो बुरुडगाव येथील कचरा डेपोत टाकला जात होता. मागील २० वर्षे कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. त्यामुळे या भागात प्रदूषण होत असल्याने त्याचा त्रास कचरा डेपो परिसरात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना होऊ लागला. त्यामुळे कुलट यांच्यासह शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे प्रकरण राष्ट्रीय हिरत लवादाकडे वर्ग केले. हरित लवादाच्या आदेशानंतर मनपाने जानेवारी २०२० मध्ये जूनमध्ये साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रीय पध्दतीने प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकदार संस्थेला ३० एप्रिलपर्यंतची मुदत दिली गेली. परंतु, मार्चअखेरीस ५० टक्के कचऱ्यावरच प्रक्रिया केली गेली असल्याचे कुलट यांचे म्हणणे आहे. स्वच्छ सर्वेक्षणात जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याला गुण आहेत. त्यामुळे मनपाने राज्य शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण कक्षाकडे पत्रव्यवहार करून पुन्हा पाहणी करण्याची विनंती केली. त्यानुसार जून २०२० मध्ये एक पथक नगरमध्ये दाखल झाले. या पथकाने कचरा डेपोची पाहणी केली व ७९ टक्के काम पूर्ण झाल्याचा अहवाल दिला, असे कुलट यांच्या तक्रारीत नमूद आहे.
महापालिकास्तरावर काम किती पूर्ण झाले याचे अहवाल रंगविले जात असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुलै २०२० मध्ये कचरा डेपोला भेट दिली. या पथकाने ४५ हजार मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून १० हजार मेट्रीक टन खत बनविल्याचा अहवाल दिला आहे. घनकचऱ्यावरील प्रक्रियेबाबत महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणी अहवालात मोठी तफावत दिसून येते. ही तफावत मोठी असून, यामुळे कचऱ्यावरील प्रक्रियेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
....
काय आहे अक्षेप
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने ४५ टक्के काम झाले, असा अहवाल घनकचऱ्यावरील शास्त्रीय पध्दतीने केलेल्या प्रक्रियेबाबत दिला आहे. असे असताना स्वच्छ सर्वेक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जून २०२० मध्ये हे काम ७९ टक्के पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कसे दिले. जुलैमध्ये कमी आणि त्यापूर्वी म्हणजे जूनमध्ये जास्त काम झाले का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
...
महापालिकेने घनकचऱ्यावर ७९ टक्के काम पूर्ण झाल्याची खोटी माहिती दिली असून, याबाबत राज्याचे स्वच्छ भारत अभियान कक्ष, स्वच्छ भारत अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींकडे तक्रार केली आहे. तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे याबाबत सुनावणी सुरू आहे. त्यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिली जाईल.
- राधाकिसन कुलट, शेतकरी, बुरुडगाव