संगमनेर : काँग्रेस पक्षाने मला आमदारकी दिली. न मागता विविध खात्यांची मंत्रिपदे मिळाली. आपण पदासाठी कधीच आग्रह धरला नाही. मात्र, ही आयुष्यातील मोठी चूक झाल्याची स्पष्ट कबुली माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली. थोरात यांना मुख्यमंत्रीपदाने अनेकदा हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांनी ही सल अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली. संगमनेर पत्रकार मंचच्या वतीने सोमवारी आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष्यामध्ये माझ्या हातून सगळ्यात काय चांगले झाले असेल तर ते निळवंडे धरण. १९९९ ला मी पाटबंधारे राज्यमंत्री झाल्यावर कामास गती दिली. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या साथीने ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ ही संकल्पना राबविली. स्वत:ची ५ एकर जमीन दिली. आता उर्वरिक काम व कालव्यांसाठी १०० कोटींपेक्षा अधिक निधीची गरज असताना सरकारने फक्त १३ कोटी दिले. याबाबत आपला पाठपुरावा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. २००६ ला समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर झाला, पण त्याचा वेगळा अर्थ लावला गेला. पिण्याचे पाणी खालच्या भागाला देण्यास आपण विरोध केला नाही. पण, निळवंडेचे पाणी गेले तर दुष्काळाची भिती आहे, असे त्यांनी सांगितले. बायपास, प्रवरेला जोड पूल, निंबाळे रिंगरोड, म्हाळुंगीचा रस्ता, निळवंडेतून पाईपलाईन, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, न्यायालयीन इमारत अशी अनेक कामे केली. तंबाखू व विडी उद्योगावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. कारखाने बंद काळात त्यांना बेरोजगार भत्ता दिला पाहिजे. जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर संगमनेर जिल्हा व्हावा, अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीबाबत विचारले असता, मी कधीही पक्ष सोडण्याचा विचार केलेला नसल्याचे ते म्हणाले. साखर कारखान्यांना पाणी दिले नाही तर उसाचे गाळप कसे होणार? मात्र, पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे, असे त्यांनी मद्य निर्मिती संदर्भातील प्रश्नावर स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पदाचा आग्रह धरला नाही, ही मोठी चूक
By admin | Published: April 25, 2016 11:18 PM