Ahmednagar Lok Sabha ( Marathi News ) :अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे विरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात चुरशीची लढत होत आहे. नगर दक्षिणच्या या लढतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ज्यांच्या उमेदवारीवरून मोठा राजकीय गदारोळ झाला होता ते अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंके यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार आणि एमआयएम उमेदवारानेही आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे मविआचे उमेदवार निलेश लंके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निलेश साहेबराव लंके या नावाच्या अपक्ष उमेदवाराने निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या अडचणी वाढल्या होत्या. नावामुळे फसगत होऊन आपली काही मते अपक्ष उमेदवाराला जाऊ शकतात, अशी भीती मविआ समर्थकांना होती. मात्र आज अखेरच्या क्षणी सदर अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे.
दरम्यान, सुजय विखे यांनीच हा डमी उमेदवार दिल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. डमी राजकारण करण्याची विखेंची परंपराच आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली होती.
नगरमधून वंचितची माघार नाहीच!
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप कोंडीबा खेडकर यांचा अर्ज कायम असून त्यांना चहाची किटली हे निवडणूक चिन्ह देण्यात आली आहे. याबाबत स्वत: खेडकर यांनी माहिती दिली आली. माझ्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन घसरली आहे आणि त्यांनी एक खोटी प्रेस नोट प्रसिद्ध करून खेडकर यांनी अर्ज माघारी घेतल्याची अफवा पसरवली, असा आररोप दिलीप खेडकर यांनी केला आहे.