Shrigonda Vidhan Sabha ( Marathi News ) :श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या राहुल जगताप यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तसे पत्र प्रदेश सरचिटणीस स्वींद्र पवार यांनी दिले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे सेनेच्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळाली. तरीही राष्ट्रवादीचे राहुल जगताप हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता.
निवडणूक प्रचारात शरद पवार यांचा आपल्या बंडखोरीला पाठिंबा आहे, असा प्रचार जगताप करत होते. त्यामुळे तालुक्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या तक्रारीवरून राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित केल्याची माहिती आहे. या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के म्हणाले, राहुल जगताप हे शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ उद्धव सेनेने बळकावला. त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते चिडले. त्यांनी राहुल जगताप यांना अपक्ष उमेदवारीचा आग्रह धरला. पक्षाने त्यांना निलंबित केल्याचे समजले. आमचा कोणताही राग नाही. आमच्या हृदयात शरद पवारच आहेत, असे शिर्के यांनी सांगितले.
आमदार म्हणून शेवटचे भाषण ऐकायला या; पाचपुतेंची भावनिक साद!
'आमदार म्हणून माझे शेवटचे भाषण ऐकायला त्याच भैरवनाथ चौकात या' अशी भावनिक साद माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मतदारांना घातली आहे. पाचपुते हे १९८० साली जनता पक्षाच्या तिकिटावर प्रथम विधानसभेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विधानसभा निवडणूक लढवली. ते सात वेळेस आमदार झाले. तसेच एक तपापेक्षा अधिक काळ मंत्रीही होते. यावेळची पहिली निवडणूक आहे ज्यात ते स्वतः उमेदवार नाहीत. आजारपणामुळे त्यांनी यावेळची निवडणूक लढवली नाही. पुढेही ते निवडणूक लढविणार नाहीत. त्यामुळे आमदार म्हणून आपण सोमवारी शेवटचे भाषण काष्टीच्या भैरवनाथ चौकात करणार आहोत. ते ऐकायला या, अशी साद त्यांनी घातली आहे. येथील सभेचा जुना फोटो शेअर करत त्यांनी आपल्या जुन्या कारकिर्दीची आठवणही करुन दिली आहे. दुपारी १ वाजता त्यांची ही सभा होणार आहे, अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केले.