- प्रकाश महालेराजूर (जि. अहमदनगर) : अतिवृष्टीमुळे माझ्या बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मीही गावरान भाजीपाला पिकांची दोनदा लागवड केली; पण हातात काहीच आले नाही. हिंमत न सोडता, माझ्या शेतकऱ्यांना दर्जेदार गावरान भाजीपाला पिकांचे बियाणे मिळावे, हा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी आपण शेतात तिसऱ्यांदा वेलवर्गीय भाजीपाल्याची बाग फुलवली असल्याचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.चालू खरीप हंगामात सर्वत्र अतिवृष्टीने पिकांना फटका बसला आहे. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनाही भाजीपाला पिकांची लागवड त्यांना तब्बल तीन वेळेला करावी लागली. या काळात त्यांनी घरात होते नव्हते हे सर्व बियाणे शेतात पेरले. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाचा फटका यंदा त्यांच्या शेतीलाही बसला. जिद्द आणि कष्टाळू राहीबाईंनी निसर्गापुढे हार मानली नाही. संधी मिळताच भाजीपाला पिकांच्या लागवडी त्या करत राहिल्या. चालू हंगामात बियाणे तयार होणार नाही, अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र, निराश न होता त्यांनी घरातील सदस्यांना बरोबर घेत, पुन्हा एकदा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली. कारली, दोडका, घोसाळी, वाल, चंदन बटवा, मिरची, टोमॅटो, वांगी, डांगर भोपळा, दुधी भोपळा, काकडी, खरबूज इत्यादी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या अस्सल वाणांची लागवड त्यांनी यशस्वी करून दाखविली आहे.
बीजमातेने जिद्दीने पुन्हा उभारला बियाण्यांचा मळा, अतिवृष्टीने डगमगल्या नाहीत राहीबाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:44 AM