आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ४ - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी स्व़ पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील सहाय्यता योजना हाती घेण्यात आली असून, जिल्ह्यातील २०८ शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्यात आले आहे़ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या १५ जून रोजी या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे़ कुटुंबातील मुलींचे लग्न, शिक्षण आणि कुटुंबातील एकास नोकरी आणि उपचाराची जबाबदारी विखे परिवार घेत असल्याचे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुजय विखे यांनी सांगितले़ मराठा क्रांती मोर्चाला मिळालेल्या निधीतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीची भावना त्यावेळी समन्वय समितीच्या सभेत व्यक्त केली होती़ परंतु, त्यास विरोध झाला़ तेव्हापासून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत करण्याचा विचार होता़ युतीच्या काळात नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत जिल्ह्यातील २०८ शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या़ त्यापैकी १७० सरकारी मदतीला पात्र ठरले़ गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या घरी जावून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या़ ही कुटुंब अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत़ सरकारच्या संजय गांधी योजनेसारख्या योजनेचा लाभ देखील त्यांना मिळत नाही़ एवढेच नव्हे तर या कुटुंबाची सरकारी यंत्रणेकडून साधी विचारपूसदेखील केली गेली नाही, हे वास्तव आहे़ केवळ आर्थिक मदत देवून आपली जबाबदारी संपणारी नाही़ त्यांना आधार देवून मुख्य प्रवाहात आणावे लागेल, त्यादृष्टीने दोन महिने अभ्यास केला़ त्यातून या कुटुंबाना सक्षम करण्याची गरज असल्याचे समोर आले़ समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा ४० लाखांचा प्रिमियम दरवर्षी भरतो़ त्यातून शेतकऱ्यांना ९० लाखांची मदत झाली़ पद्मभूषण स्व़ बाळासाहेब विखे यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी लढा दिला़ शेतकऱ्यांसाठी त्यांची नेहमीच तळमळ असायाची़ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार, हीच त्यांना श्रध्दांजली ठरू शकते़ त्यांच्याच नावाने प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करून पुढे ती व्यापक बनविण्याचा प्रयत्न असल्याचे विखे म्हणाले़ योजनेची वैशिष्ट्ये
- मुला-मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देणार
- मुलींच्या लग्नाचा खर्च दिला जाणार
- कुटुंबातील एकाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना
- उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणार
- कुटुंबातील व्यक्तींना आजीवन मोफत उपचार
- मोफत विमा योजना