प्रभुपिंपरी येथील राजदीप मजूर सहकारी संस्थेला पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे नलवडे या जोडरस्त्याचे ११०० मीटर अंतराचे खडीकरण व डांबरीकरणाचे दहा लाख रुपयांचे निधीचे काम मिळाले. डिसेंबर २०१९ ला कामाचा कार्यारंभ आदेश निघाला. त्यानुसार ३१ मार्च २०२१ पर्यंत काम करण्याची प्रत्यक्ष मुदत दिली होती. या कालावधीत ठेकेदाराने मात्र हे काम केलेच नाही.
शुक्रवारी, शनिवारी अचानकपणे या रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा उपसरपंच प्रकाश दौडे, अमोल नलवडे यांनी पाहिले. त्यांनी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, भाजप उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी ग्रामस्थांसमवेत रस्त्यांची पाहणी केली. त्यातून हे गौडबंगाल समोर आले. यावेळी ठेकदार व उपस्थित तक्रारदार यांच्यात मोठी खडाजंगी झाली. बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी लागत नसल्याने त्यात अधिक भर पडली.
...............
रस्ता कामाच्या तक्रारी कार्यालयास मिळाल्या आहेत. कामाची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना दिला जाईल.
-शीतल खिंडे, गटविकास अधिकारी