महिनाभरापूर्वी नगर जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाली. सर्वांत आधी श्रीगोंदे तालुक्यातील मृत कावळ्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळला. त्यानंतर नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, संगमनेर तालुक्यातील शिंदोडी, पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द आणि वासुंदे, राहुरी तालुक्यातील सडे या ठिकाणी कोंबड्यांना बर्ड फ्लू संसर्ग झालेला आढळला. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्या भागात १ किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. परिणामी चिचोंडीत ६३५, राहुरी तालुक्यातील सडे येथे २१७९, शिंदोडी येथे २७०१ व वासुंदे येथे ८९९४ अशा एकूण १४ हजार ५१२ कोंबड्यांची विल्हेवाट प्रशासनाने लावली आहे. याशिवाय १४२४ अंडी व १२०० किलो पशुखाद्यही नष्ट करण्यात आले. चार ठिकाणच्या कुक्कुटपालकांना एकूण आठ लाख ४२ हजार भरपाई शासनाने मंजूर केली आहे.
.......................
नवापूरला नगरमधून ३९ पथके रवाना
नाशिक विभागात नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथे मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असून, तेथील तब्बल नऊ लाख कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी नाशिक विभागातील सर्वच जिल्ह्यांतून पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवापूरला पाचारण करण्यात येत आहे. या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार असल्याने नगर जिल्ह्यातून नवापूरला ३९ पथके रवाना झाली आहेत.