अहमदनगर : येथील वेदांतनगरमधील श्रीदत्तक्षेत्रामध्ये भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा शासकीय निर्देशांचे तंतोतंत पालन करत मोठ्या श्रद्धेने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्री दत्त देवस्थान ट्रस्टने या सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. श्रीक्षेत्र गाणगापूर येथील प्रथेप्रमाणे दुपारी १२ वाजता शंखध्वनीच्या निनादात भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा झाला. उपस्थितांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा गजर केला. भगवान श्रीदत्तात्रेयांची बालमूर्ती फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये विराजमान करण्यात आली होती. महाआरतीत देवस्थानचे विश्वस्त सचिव संजय क्षीरसागर, विश्वस्त देवराज काशीकर, दिनेश पटवर्धन, प्रदीप जोशी, तुषार कर्णिक आणि कर्मचारी वृंद सहभागी झाले होते. श्रीदत्तयाग सोहळ्याची विधीवत सांगता झाली. श्रीदत्तक्षेत्रचा संपूर्ण परिसर केळीच्या खुंटांनी, आंब्याच्या पानांच्या व फुलांच्या तोरणांनी, आकर्षक रांगोळ्यांनी आणि रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आला होता. विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाईही करण्यात आली होती. भगवान श्रीदत्तात्रेयांच्या मंदिरातील गर्भगृह व श्री.रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अधिष्ठान अनेकविध फुलांनी आकर्षकरीत्या सजवले होते. सायंकाळी ७ वाजता आरती व पदे झाल्यावर पालखी सोहळा पार पडला. भगवान श्रीदत्तात्रेय मंदिराच्या सभामंडपातच फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. वेदांत विद्यापीठमधील उपस्थित विद्यार्थ्यांनी वेदपठण केले. यावेळी फटाक्यांची नयनरम्य आतषबाजीही करण्यात आली.
सावेडीच्या दत्त मंदिरात जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:28 AM