महसूलमंत्री थोरात शनिवारी (दि. १०) संगमनेरात आले असता येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा बैठकीत आढावा घेतला.
यावेळी आमदार डाॅ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, पंचायत समिती सभापती सुनंदा जाेर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री आदी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, गेल्या वर्षात व्यापारी बांधवांचे मोठे नुकसान झाले. हातावर पोट असलेल्यांची परस्थिती अवघड आहे. परंतु हे संकटच बिकट असून त्याला सामोरे जावेच लागणार आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज कुणाला आहे, कुणाला नाही याबाबतचे काही संकेत पाळावे लागतील. इंजेक्शनची साठेबाजी थांबली पाहिजे. याचे निर्णय होत आहेत. काही निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी लागेल.
-----------------------------
सर्वांनी कोरोनाला हरवले पाहिजे
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या याबाबत काळजी घेण्यासाठी आम्ही सतर्क आहोत. हे काम करताना सर्वपक्षीय मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. मात्र, काही लोक यात राजकारण करतात. हे दुर्देवी आहे. कोरोनाविरोधातील लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढली पाहिजे. कोरोनाला हरविले पाहिजे.