योगेश गुंड
केडगाव : गावात ग्रामविकासाचे मोठे काम करून गावाला आदर्शाचा चेहरा देणाऱ्या गावात बिनविरोध निवडणुकीची अपेक्षा फोल ठरली. नगर तालुक्यातील ज्या गावांनी राज्यातील इतर गावांपुढे दिशादर्शक आदर्श ठेवला. आज त्याच गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कडवा राजकीय संघर्ष उफाळला आहे. गावाला राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळूनही ही आदर्श गावे सध्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
नगर तालुक्यातील हिवरेबाजार, मांजरसुंबा, डोंगरगण, गुंडेगाव, बहिरवाडी, निंबळक, देवगाव या गावांनी राष्ट्रीय, राज्यस्तरावरील आणि जिल्हा पातळीवरील विविध शासकीय पुरस्कार पटकावले आहेत. गावात एकोपा निर्माण करून गावाला आदर्श गावाचा चेहरा देण्यासाठी याच गावातील गावकरी दिवस-रात्र राब राब राबले. त्यांच्या एकीच्या बळातून आणि सामुदायिक श्रमदानातून गावाचा चेहरामोहरा बदलला. हीच किमया पाहण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशातील गावे या गावांना भेटी देण्यासाठी गर्दी करता. आज त्याच गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातील राजकीय संघर्ष उफाळून आला आहे.
हिवरेबाजार गावाने राष्ट्रीय स्तरावरील दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळवले. एवढेच नाही तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात सलग दोन वेळा प्रथम पुरस्कार आणि संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळवला. आज त्याच गावात निवडणुकीसाठी पोलिसांना निवेदन देण्याची वेळ आली.
‘एकजुटीने पेटलं रान तुफान आलया’ असं म्हणत एकीच्या बळावर गावाचा चेहरा बदलला. त्याच मांजरसुंबा आणि डोंगरगण या गावात सध्या निवडणुकीची लढाई जोरात सुरू आहे. मांजरसुंबा गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता आणि सामाजिक एकता पुरस्कार मिळवले, तसेच संत तुकाराम वनग्राम आणि निर्मलग्राम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. त्याच गावातील राजकीय संघर्ष निवडणुकीत तीव्र बनला आहे. डोंगरगण गावाचीही हीच परिस्थिती आहे. या गावाने जिल्हापातळीवर प्रथम क्रमांकाचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळवला. निर्मलग्राम पुरस्कारातही डोंगरगणने जिल्ह्यात आपला झेंडा फडकवला. आज त्याच गावात ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी घमासान सुरू आहे.
बहिरवाडी गावाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. या गावानेही राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम पुरस्कारात प्रथम क्रमांक मिळवला. आज तेही गाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. शाहू, फुले, आंबेडकर विभागीय आणि जिल्हा पातळीवर पुरस्कार पटकावणाऱ्या निंबळक गावात तर सत्ता मिळविण्यासाठी तीन आघाड्या तयार झाल्या आहेत.
---
गुंडेगावातही राजकीय संघर्ष
गुंडेगावने संत तुकाराम वनग्राम पुरस्कारात राज्यात आपला झेंडा फडकवला. जलयुक्त शिवार अभियान, महात्मा फुले भूमी जलसंधारण अभियानात राज्यस्तरावरील पुरस्कार मिळवले. आज तेच गुंडेगाव कडव्या राजकीय संघर्षाला तोंड देत आहे.