जामखेड : दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत गेलेले दोन अपक्ष व एक राष्ट्रवादीचा गटनेता यांनी कधीच भाजप प्रवेश केला नव्हता. तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहराच्या विकासासाठी ते एकत्र आले होते. त्यातील एका अपक्षाला उपनगराध्यक्ष केले होते. त्यांच्या जाण्याने भाजपला धक्का वगैरे होत असलेला अपप्रचार हा धादांत खोटा आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक बिभिषण धनवडे यांनी दिली आहे.
राज्यात राम शिंदे हे त्यावेळी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने अपक्ष, राष्ट्रवादी व शिवसेना नगरसेवकांना बरोबर घेऊन शहरात विकासात्मक कामे झाली आहेत. तर काही प्रगतीपथावर आहेत. सोबत घेतलेले सर्व नगरसेवक अद्यापही आपापल्या पक्षात कार्यरत आहेत.
जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोबत घेतलेले नगरसेवक कोणत्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करीत आहे ही शहरातील सुज्ञ नागरिक ओळखून आहे, असा टोलाही धनवडे यांनी पक्षप्रवेश करणाºया नगरसेवकांना लगावला.