अहमदनगर : महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपकडून अखेर नाव निश्चित करण्यात आले असून हे पद भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व गटनेत्या मालन ढोणे यांना द्यावे, अशी शिफारस शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे केली आहे. यावर आता शेंडगे या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ढोणे यांच्या शिफारशीचे महापौरांना पत्र देताना भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज दुल्लम, प्रदीप परदेशी, मनोज कोतकर, रामदास आंधळे, अजय चितळे, अजय ढोणे, प्रताप परदेशी, सतीश शिंदे, विलास ताठे, उदय कराळे, राहुल कांबळे, संजय ढोणे, अभिजित ढोणे, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या गटनेत्या मालन ढोणे यांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपाच्या उर्वरित चार महिन्यांच्या कालावधीसाठी महापौर रोहिणी शेंडगे यांनी ढोणे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, या मागणीचे आम्ही निवेदन दिले असल्याचे यावेळी गंधे यांनी सांगितले.