जामखेड - 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, असे सांगितले होते. मात्र एक रुपयाही कोणाच्याही खात्यात जमा झालेला नाही. महाराष्ट्र आणि केंद्रात शेतक-याचा कैवारी असलेला एकही मंत्री नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी भाजपा सरकारवर केली. जामखेड येथील परिवर्तन सभेत मुंडे बोलत होते.
मुंडे म्हणाले, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सव्वा वषार्पूर्वी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. मात्र अद्याप काम नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. अद्याप एकही वीट रचली नाही.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर चौकशी करू. निवडणुकीत नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील, असे निवडणुकीत सांगितले होेते. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ‘यह चुनावी जमला है’ असे सांगतात. कर्जमाफी पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ म्हणाले अजून दिली नाही, अशी टीका पाटील यांनी केली.