संगमनेर : राज्य सरकारवर अवलंबून राहून शेतकरी सुखी होणार नाहीत. भाजप सरकारचे मंत्री फक्त घोषणा करतात आणि मग विचार करतात. कोणत्याच निर्णयाची अंमलबजावणी या सरकारकडून होत नाही. कर्जमाफी योजनेप्रमाणेच राज्यातील दुध उत्पादकांनाही या सरकारने फसवले आहे. दूध उत्पादकांना पाच रूपयांचा दर वाढवून देण्यातही सरकारने खोटेपणा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.शनिवारी तालुक्यातील मनोली येथे एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विखे यांनी सरकारवर टीका केली. अमुल दुध संघाचे सह व्यवस्थापक प्रभाकर चौरे, डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जिल्हा परिषद सदस्या अॅड. रोहीणी निघुते, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, भगवानराव इलग, रामभाऊ भुसाळ, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी आधिकारी कारभारी नवले, पंचायत समितीचे गटविकास आधिकारी सुरेश शिंदे, सरपंच उज्वला शिंदे, विनय निसाळ, मच्छिंद्र भागवत, अण्णासाहेब बेंद्रे आदी उपस्थित होते.विखे म्हणाले, राज्य सरकारने दुध उत्पादकांना दर वाढवून द्यावेत या मागणीसाठी नागपुर आधिवेशनात आपण मागणी लावून धरली होती. सरकारने केवळ घोषणा केली. पण आज तागायत दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतेही पैसे वर्ग केले नाहीत. शेतकरी कर्जमाफी योजनेतही हाच प्रकार सरकारने केला. मुख्यमंत्र्यांपासुन सर्व मंत्री आधी घोषणा करतात आणि मग त्याचा विचार करतात. असे अनेक फतवे मंत्र्यांनी मागे घेतल्याची उदाहरणे असल्याचे विखे म्हणाले.