संगमनेर : भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच वर्षात आलेली ही पध्दत चुकीची आहे. भाजप सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. शुक्रवारी संगमनेरात आयोजित पत्रकार परिषदेत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. ते म्हणाले, राजकारण करताना केंद्रीय पातळीवरील संस्थांचा उपयोग केला जातो आहे. भाजप सरकार हेच करते आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आली. यातील राजकारण सर्वसामान्य जनतेला समजते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी त्यांचा काहीही संबंध नसून ते बॅँकेचे कधी सभासद अथवा पदावर देखील नव्हते. पवारांनी पन्नास वर्षे राज्याच्या, देशाच्या संसदीय कार्यात सहभाग घेतला. महत्वाची पदे त्यांनी सांभाळली. केंद्रात, राज्यात कृषी क्षेत्रात त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले असून प्रत्येक कुटुंबापर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे. दौºयावर असताना त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस पाठविण्यात आली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सर्व सुरू आहे. भाजपात प्रवेश केलेल्या कुठल्याही लोकांना नोटीस पाठविली गेलेली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. राजकारण करताना भाजपचे धोरण चुकीचे असून लोकशाही मानणाºया सर्व घटकांनी याचा निषेध केला पाहिजे, असेही कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले.
भाजपकडून दबावतंत्राचा वापर-बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:15 PM