जामखेड : आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत नियोजन करून महत्त्वाच्या असलेल्या खर्डा, साकत, चोंडी, तेलंगशी व इतर ३५ ग्रामपंचायतींमध्ये नवीन चेहरे देऊन सत्ता हस्तगत केली. चौंडीत माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे समर्थक पराभूत झाले. तालुक्यात भाजपने भाकरी न फिरवल्याने त्यांना फटका बसला आहे. अवघ्या नऊ ग्रामपंचायती भाजपकडे राहिल्या.
खर्डा ग्रामपंचायतीमध्ये दोन जागा भाजपच्या बिनविरोध झाल्या. त्यामुळे येथे भाजपला यश अपेक्षित होते. मात्र, रोहित पवार यांनी त्यानंतरही तेथे बैठका घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन राष्ट्रवादीला बळ दिले. शेवटच्या टप्प्यात १७ पैकी १० जागा जिंकून एकहाती सत्ता आणली. साकतची १५ वर्षांची सत्ता, तेलंगशी येथील २५ वर्षांपासूनची सत्ता मोडीत काढली. यासाठी गावोगाव नवीन युवक कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक गावागावांत उभी केली व प्रत्येक गावातील आढावा घेऊन ग्रामपंचायतीसाठी मायक्रो नियोजन केले. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी ग्रामपंचायतीला जुनेच चेहरे दिले. त्यांना मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे.