BJP Radhakrishna Vikhe Patil: वादग्रस्त वक्तव्ये करणारे भाजप नेते आणि राज्यमंत्री नितेश राणे यांना पक्षाच्याच नेत्याकडून घरचा आहेर देण्यात आला आहे. "समाजामध्ये संभ्रम आणि असंतोष होईल, अशी विधाने होता कामा नये. आपल्याकडे इतकी काम आहेत, प्रभावी योजना आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला मोठ्या बहुमताने विजयी केले आहे. यावर जरी प्रभावी काम आपण केले तर चांगला संदेश जाईल, असं माझं व्यक्तिगत मत आहे," असा टोला जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांना लगावला आहे.
मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री विखे-पाटील यांनी उत्तर दिले. मढी येथील वादाची सर्व माहिती आपण प्रशासनाकडून घेतली असून, यामध्ये योग्य मार्ग काढण्याच्या दृष्टीने आमदार महोदयांशी संपर्कात आहोत, असेही विखे-पाटील म्हणाले.
पालकमंत्र्यांसमोर 'छात्रभारती'च्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की
संगमनेरमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर घोषणाबाजी केली. त्यामुळे महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.
नितेश राणे अहिल्यानगर जिल्ह्यात येऊन सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. त्यांना रोखा, अशी मागणी छात्रभारतीने विखे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. गुरुवारी विखे यांची नगरपरिषदेच्या सभागृहात आढावा बैठक होती. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार अमोल खताळ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर विखे, खताळ हे सभागृहाच्या बाहेर पडत असताना छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले व कार्यकर्त्यांनी मंत्री राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली त्यामुळे गोंधळ उडाला. घुले हे विखे यांना निवेदन देण्यासाठी जात असताना महायुतीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळ उडाला.