पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे व खा. डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे अण्णांची भेट घेऊन चर्चा केली. अण्णांनी दिल्लीत उपोषणाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस सुनील थोरात उपस्थित होते. रविवारीच दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी राळेगणमध्ये अण्णांची भेट घेऊन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे नेते राळेगणमध्ये आले.
अण्णांनी केलेल्या मागण्या शेतकरी हिताच्या असून त्यासंबंधी चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल. अण्णांचे वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबू नये, असा आग्रह भाजप नेत्यांनी अण्णांकडे केला. हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. २३ मार्च २०१८ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान आणि ३० जानेवारी २०१९ रोजी राळेगणसिद्धी येथे केलेल्या आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय कृषिमंत्री यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्षांत या आश्वासनाचे पालन झाले नसल्याची आठवण यावेळी अण्णांनी भाजप नेत्यांना करून दिली.
बागडे आणि खा. डॉ. कराड यांनी यावेळी अण्णांना सुधारित कृषी कायद्याची मराठी आवृत्ती दिली. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. यातून लवकरच देशातील शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचे पहायला मिळेल, असे भाजप नेत्यांनी सांगितले.
-----
अण्णांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक
या सर्व प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा, अशी मागणी अण्णांकडे केली आहे. केंद्रीय पातळीवर चर्चा करून अण्णांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे खा. डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.