भाजप सहकार गाडायला निघालाय - भालचंद्र कांगो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 07:04 PM2018-02-10T19:04:27+5:302018-02-10T19:08:32+5:30
भाजपला वाटतंय काँग्रेस सहकारामुळे बळकट आहे, म्हणून ते सहकाराच्या मुळावर घाव घालत आहेत. तर काँग्रेसने सहकाराच्या नावाखाली खासगी संस्थांचे रान पेटवले आहे.
अहमदनगर : देशात महाराष्ट्राच्या सहकाराचा नावलौकिक आहे. परंतु आता भाजपसह काँग्रेसही सहकाराच्या मुळावर उठलाय. भाजपला वाटतंय काँग्रेस सहकारामुळे बळकट आहे, म्हणून ते सहकाराच्या मुळावर घाव घालत आहेत. तर काँग्रेसने सहकाराच्या नावाखाली खासगी संस्थांचे रान पेटवले आहे. म्हणजे दोघांनीही सहकार गाडायचे ठरवले आहे, अशी घणाघाती टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भालचंद्र कांगो यांनी केली.
शनिवारपासून सुरू झालेल्या भाकपच्या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन कांगो यांच्या हस्ते मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, कामगार नेते मिलिंद रानडे, कॉ. बाबा आरगडे, महेबूब सय्यद, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, शांताराम वाळुंज, अॅड. सुधीर टोकेकर, स्मिता पानसरे, शिवाजी देवढे, ज्ञानदेव पांडुळे, कॉ. बहिरनाथ वाकळे, कॉ. शंकर न्यालपेल्ली, संजय नांगरे, राधेशाम गुंजाळ, वैभव शिंदे आदींसह कामगार, कष्टकरी उपस्थित होते.
कांगो यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या संघर्षमय इतिहासाला उजाळा देत भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. या फॅसिस्ट सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे. काही आर्थिक संकट आलं की आपले पंतप्रधान त्याला जगातील घडामोडींचा परिणाम म्हणून सांगतात अन् चांगलं झालं की आपल्यामुळे झाल्याचा आव आणतात. गेल्या काही दिवसांत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारच्या धोरणांना कंटाळूनच महाराष्ट्रातील शेतकºयांनी अभूतपूर्व संप केला. त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. परंतु त्यातही लबाडी केली. त्यामुळे हे फेकू सरकार आहे. द्यायचे काहीच नाही, केवळ घोषणा करायच्या असा एककल्ली कार्यक्रम सुरू आहे, असे ते म्हणाले.
कम्युनिस्ट पक्षाचा विकासाला कधीच विरोध नव्हता, यापुढेही राहणार नाही. परंतु विकास लोकहिताचा असावा. पक्षाने कायम कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष केला. यापुढेही करत राहील, कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी, तसेच पक्षवाढीसाठी सदैव तयार राहावे, असे आवाहन कांगो यांनी केले.
जिल्हास्तरानंतर पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन पुढील महिन्यात शहादा (जि. नंदुरबार)येथे, तर राष्ट्रीय अधिवेशन एप्रिलमध्ये केरळला होणार असल्याची माहिती लांडे यांनी दिली.